‘आम्ही बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार करू’, पीसीबीने भारताविरोधात का दिले हे वक्तव्य?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सर्वसाधारण सभा नुकतीच अहमदाबादमध्ये पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. BCCI ने आशिया कप 2023 साठी पाकिस्तानने प्रस्तावित केलेल्या हायब्रीड मॉडेलवर चर्चा केली असून मिळालेल्या माहितीनुसार, BCCI पाकिस्तानच्या या हायब्रीड मॉडेलला विरोध करण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही.

त्यामुळे हादरलेल्या पाकिस्तानने भारताविरोधात आयसीसीकडे तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) म्हटले आहे की ते बीसीसीआयच्या महसूल वाट्याबाबत आयसीसीकडे तक्रार करणार आहेत. याबाबत आम्ही आयसीसी प्रमुख ग्रेग बार्कले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पीसीबीचे म्हणणे आहे. ग्रेग बार्कले पहिल्यांदाच पाकिस्तानला भेट देणार आहेत.

आयसीसीच्या प्रस्तावित महसूल वाटा मॉडेलमध्ये बीसीसीआयचा 38.5 टक्के हिस्सा असेल. त्यानंतर इंग्लंडला 6.89 टक्के, ऑस्ट्रेलियाला 6.25 टक्के आणि पाकिस्तानला 5.75 टक्के वाटा मिळतील, पण पाकिस्तान या विभागणीवर खूश नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसीच्या महसुलात चांगला वाटा देण्याची मागणी करत आहे. एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले त्यांचे अनेक क्रिकेटपटू आयसीसी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये आहेत, त्यामुळे पाकिस्तानला अधिक चांगला वाटा मिळावा, असा युक्तिवाद केला जात आहे.

जिओ टीव्हीशी बोलताना पाकिस्तान बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आमचे क्रिकेटपटू क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. पाकिस्तान वनडे क्रमवारीत दुसऱ्या तर टी-२० क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. उत्पन्नाचा कमी वाटा कसा मिळेल? हे महसूल मॉडेल कशावर आधारित आहे हे पीसीबीला जाणून घ्यायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *