आयपीएलनंतर कोहलीने सोशल मीडियाच्या खेळपट्टीवरही खेळली धमाकेदार खेळी, केला नवा विक्रम

भारताचा फलंदाज विराट कोहलीने आयपीएलच्या चालू हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने सलग 2 शतकांसह 6 अर्धशतकांसह 639 धावा केल्या. विराटचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकला नसला तरी त्याने आपल्या दमदार कामगिरीने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. विराट आता क्रिकेटच्या मैदानावर आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. इन्स्टाग्रामवरही त्याने आपला दमदार फॉर्म दाखवला.

IPL 2023 मध्ये धोनीनंतर विराट कोहलीलाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण स्टेडियम विराट…विराट… असा जयघोष करत होता. आता इंस्टाग्रामवरही त्याच्या फॅन फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. विराट कोहलीने 250 मिलियन फॉलोअर्सचा (25 कोटी) टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे इंस्टाग्रामवर एवढ्या मोठ्या फॅन फॉलोअर्स असलेला विराट हा आशियातील पहिला खेळाडू ठरला आहे.

विराट कोहलीने इंस्टा फॅन फॉलोइंगमध्ये धोनी आणि तेंडुलकरसारख्या भारतीय क्रिकेट जगतातील मोठ्या नावांना मागे टाकले आहे. भारताच्या मास्टर ब्लास्टरचे इंस्टाग्रामवर ४०.४ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर महेंद्रसिंग धोनीचे इन्स्टाग्रामवर ४२.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. आशिया खंडात सर्वाधिक फॅन फॉलोइंग असलेल्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.

क्रीडा जगताचा विचार केला तर, इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असलेल्या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आघाडीवर आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 585 मिलियन फॅन फॉलोअर्स आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लिओनेल मेस्सीचा क्रमांक येतो. त्याचे 463 मिलियन फॅन फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, आयपीएलच्या 16 व्या मोसमाच्या लीग टप्प्यात आरसीबी बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीची नजर आता डब्ल्यूटीसी फायनलकडे आहे. तो काल लंडनला पोहोचला असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याची तयारी करत आहे. आयपीएलमधील विराट कोहलीचा फॉर्म पाहता WTC फायनलमध्ये त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *